48
मोआबी लोकांविषयी संदेश 
 
1 मोआबी लोकांविषयी:  
   
 
इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह, यांनी दिलेला संदेश हा आहे:  
“नबो शहराचा धिक्कार असो, कारण त्याचा विध्वंस होईल.  
किर्याथाईम लज्जित होईल व हस्तगत करण्यात येईल;  
तेथील किल्ले लज्जित होतील व चक्काचूर करण्यात येतील.   
2 आता यापुढे मोआबाची कोणीही प्रंशसा करणार नाही;  
हेशबोनमधील लोक तिच्या अधःपतनाचा कट रचतील:  
ते म्हणतील, ‘चला, आपण त्या राष्ट्राचा अंत करू.’  
तुम्ही मदमेनमधील लोकही निःशब्द केले जातील;  
तलवार तुमचा पाठलाग करेल.   
3 नंतर होरोनाईममधून विलापध्वनी ऐकू येत आहे,  
प्रचंड संहाराचा व विध्वंसाचा आक्रांत ऐकू येत आहे.   
4 कारण मोआब भूमीचा भंग केला जाणार आहे,  
तिचे बालक विलाप करतील.   
5 ते लुहिथच्या डोंगरावर चढतील  
व चढताना आक्रोश करीत जातील;  
व होरोनाईम नगराच्या उतरणीवरून  
विनाश बघतांनाच्या किंकाळ्या ऐकू येतील.   
6 पळा, जीव घेऊन पळा!  
रानावनात झुडूपागत व्हा.   
7 कारण तुम्ही आपल्या कार्यावर व धनसंपत्तीवर भरवसा ठेवला होता,  
तुम्हालादेखील बंदिवान म्हणून नेण्यात येईल.  
तुमचे दैवत कमोश बंदिवासात जाईल,  
त्याचे याजक आणि सरदार हे सर्वजण नेले जातील.   
8 विनाशक प्रत्येक नगराविरुद्ध येईल,  
एकाही नगराची त्याच्या हातून सुटका होणार नाही.  
दर्याखोर्यांचा नाश होईल,  
आणि पठारे उद्ध्वस्त होतील,  
कारण याहवेहने तसे म्हटले आहे.   
9 मोआबावर मीठ टाका  
कारण तिचा उकिरडा बनेल;  
तिची नगरे उजाड़ होतील,  
तिथे कोणीही वसती करणार नाही.   
   
 
10 “याहवेहने सोपविलेले कार्य आळशीपणाने करणारा शापित असो!  
रक्तपात न करता तलवार म्यानात ठेवणारे शापित असो!   
   
 
11 “अगदी बालपणापासून मोआब सुखात राहिली.  
गाळावर स्थिर वसलेल्या द्राक्षारसाप्रमाणे,  
तरी तिला या पात्रातून त्या पात्रात ओतले गेले नाही—  
ती बंदिवासात गेलेली नाही.  
म्हणून ती पूर्ववत चवदारच आहे,  
आणि तिचा सुवासही बदललेला नाही.   
12 परंतु याहवेह म्हणतात, लवकरच असे दिवस येत आहेत,  
मी तिला बुधल्यातून ओतणारी माणसे पाठवेन,  
ते तिला या पात्रातून ओतून बाहेर टाकतील;  
ते तिचे बुधले रिकामी करतील  
व नंतर तिची पात्रे फोडून टाकतील.   
13 इस्राएलने बेथेल येथे भरवसा ठेवला,  
व मग त्यांना जशी आपल्या वासराच्या मूर्तीची लाज वाटली.  
तशीच मोआबाला आपल्या कमोशाची लाज वाटेल,   
   
 
14 “ ‘आम्ही वीरपुरुष, पराक्रमी योद्धे आहोत!’  
असे तुम्ही कसे बोलू शकता?   
15 परंतु आता मोआबचा सर्वनाश होणार आहे, तिची नगरे हस्तगत केली जाणार आहेत;  
तिच्या अत्यंत उमद्या तरुणांची कत्तल होईल,”  
असे राजाधिराज, ज्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे ते म्हणतात.   
16 “मोआबचा पाडाव अगदी जवळ आलेला आहे;  
तिच्यावरील अरिष्ट वेगाने येणार आहे.   
17 तिच्याभोवती असणाऱ्या सर्व लोकांनो, तिच्यासाठी विलाप करा,  
तिची किर्ती माहीत असणारे सर्व सामील व्हा;  
म्हणा, ‘तिचा बलशाली राजदंड कसा मोडला,  
इतकी वैभवशाली काठी कशी मोडली!’   
   
 
18 “अहो दिबोन कन्येचे निवासी,  
आपल्या वैभवावरून खाली उतरा  
आणि शुष्क भूमीवर येऊन बसा,  
कारण जे मोआब भूमीचा विनाशक  
तुमच्याविरुद्ध येत आहेत  
आणि ते तिच्या सर्व तटबंदीची नगरे नष्ट करतील.   
19 अरोएरवासी जनहो,  
तटस्थ होऊन रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहा,  
आणि पळ काढणार्या पुरुषांना व बचाव करून निघणाऱ्या स्त्रियांना विचारा,  
‘तिथे काय घडले?’   
20 मोआब लज्जित झाली आहे, ती भंग पावली आहे.  
रडा व आकांत करा!  
आर्णोनच्या काठी घोषणा करा  
मोआब नष्ट झाले आहे.   
21 पठारे—होलोन, याहसाह, मेफाथ  
यांनाही शिक्षा मिळाली आहे.   
22 दिबोन, नबो, बेथ‑दिबलाथाईम,   
23 किर्याथाईम, बेथ‑गामूल, बेथ‑मौन   
24 करीयोथ, बस्रा—  
मोआबभूमीच्या जवळच्या व दूरच्या सर्वच नगरांना शिक्षा झाली आहे.   
25 मोआबभूमीचे शिंग तोडून टाकण्यात आले आहे.  
तिचे बाहू मोडले आहेत.”  
असे याहवेह जाहीर करतात.   
   
 
26 “तिला एखाद्या दारुड्यागत होऊ दे,  
कारण तिने याहवेहविरुद्ध बंड केले आहे.  
मोआबभूमी आपल्याच वांतीत लोळू दे;  
तिला उपहासाचा विषय होऊ दे.   
27 इस्राएलही तुमच्या उपहासाचा विषय नव्हता का?  
ती चोरांच्यामध्ये पकडली गेली का,  
कारण जेव्हाही तिचा उल्लेख होतो,  
घृणाभावनेने तुम्ही आपली मान हालविता नाही का?   
28 मोआबभूमीच्या रहिवाशांनो  
आपली नगरे सोडा आणि खडकांच्या कपारीत जाऊन राहा.  
गुहेच्या तोंडाशी घरी बांधणाऱ्या  
पारव्याप्रमाणे व्हा.   
   
 
29 “आम्ही मोआबच्या गर्वाविषयी ऐकले आहे—  
तिचा गर्व किती मोठा आहे—  
तिचा उर्मटपणा, तिचा उन्मत्तपणा, तिचा अहंभाव  
आणि तिच्या अंतःकरणाची मग्रुरीही सर्व आम्हाला माहीत आहे.   
30 याहवेहने जाहीर केले, मला मोआब भूमीचा उद्धटपणा माहीत आहे, परंतु तो व्यर्थ आहे,  
तिच्या फुशारक्यांनी काहीही प्राप्त होत नाही.   
31 म्हणून मी मोआबभूमीसाठी विलाप करतो,  
मी मोआबसाठी अश्रू गाळतो,  
कीर-हरेसेथच्या लोकांसाठी मी शोक करतो.   
32 जसे याजेर शोक करतो,  
तसे मी सिबमाहच्या द्राक्षलतांसाठी शोक करतो.  
तुमच्या फांद्या समुद्रापर्यंत पसरलेल्या आहेत,  
त्या याजेरपर्यंत पोहोचतात;  
संहार करणाऱ्याने  
तुमच्या पिकलेल्या फळांवर व द्राक्षांवर हल्ला केला आहे.   
33 मोआबभूमीच्या मळ्यामधून व शेतातून  
आनंद व हर्ष लयास गेले आहेत.  
द्राक्षकुंडातून द्राक्षारसाचा प्रवाह मी बंद केला आहे;  
हर्षनाद करून द्राक्षे तुडविणारा कोणी नाही.  
ओरडणे आहे,  
होय पण ते आनंदाचे नाही.   
   
 
34 “त्यांच्या आक्रोशाचा ध्वनी उंचाविला जात आहे  
हेशबोनपासून एलिआलेह आणि याहसापर्यंत,  
सोअरापासून होरोनाईम आणि एग्लाथ-शलीशियापर्यंत तो ऐकू येत आहे,  
निम्रीमाची कुरणेही आता शुष्क झाली आहेत.   
35 जे उच्चस्थळी जाऊन अर्पणे वाहतात,  
आणि त्यांच्या खोट्या दैवतांना धूप जाळतात  
त्या मोआबभूमीत या गोष्टी मी आता बंद पाडेन,” याहवेह असे जाहीर करतात.   
36 “माझे अंतःकरण मोआबसाठी जणू बासरीवर शोकगीत गात आहे;  
कीर-हरेसेथसाठी विलापाने बासरीगत गीत गात आहे.  
त्यांनी साठविलेली विपुल संपत्ती नाहीशी झाली आहे.   
37 तेथील प्रत्येक डोक्याचे मुंडण झाले आहे  
व प्रत्येक दाढीचे बोडण झाले आहे;  
प्रत्येक हातावर घाव करण्यात आला आहे  
व प्रत्येक कमरेवर गोणपाट नेसलेला आहे.   
38 मोआबभूमीतील प्रत्येक घराच्या छतावर  
आणि प्रत्येक चौरस्त्यावर  
केवळ आकांतच आढळत आहे,  
कारण जुन्या निकामी पात्रांचा चक्काचूर करावा त्याप्रमाणे  
मोआब भूमीचा मी चुराडा केला आहे,” याहवेह असे जाहीर करतात.   
39 “पाहा, मोआबभूमी कशी मोडकळीस आली आहे! ती कशी विलाप करीत आहे!  
मोआबने लज्जेने कशी पाठ फिरविली आहे ते पाहा!  
मोआब तिच्या सभोवती असलेल्या लोकांच्या उपहासाचा  
व दहशतीचा विषय झाली आहे.”   
40 याहवेह असे म्हणतात:  
पाहा! एक गरुड आकाशातून खाली झेप घेत आहे,  
मोआबभूमीवर आपले पंख पसरवित आहे.   
41 करीयोथ पडले आहेत,  
व तेथील दुर्गमस्थाने जिंकून घेतली आहेत.  
प्रसूती वेदनांनी व्याकूळ झालेल्या स्त्रियांच्या हृदयाप्रमाणे  
मोआबच्या योद्ध्यांचे हृदय होईल.   
42 मोआब एक राष्ट्र म्हणून न राहता तिचा नाश होईल.  
कारण तिने याहवेहविरुद्ध उर्मटपणा केला आहे.   
43 हे मोआबातील लोकांनो,  
दहशत, खड्डे व पाश तुझ्या वाट्याला येतील,  
असे याहवेह म्हणतात.   
44 “जो कोणी दहशतीपासून दूर पळेल  
तो खड्ड्यात पडेल,  
जो कोणी खड्ड्यातून बाहेर पडेल,  
तो पाशात सापडेल.  
कारण मी मोआबावर  
तिच्या शिक्षेचे वर्ष आणणार आहे.  
याहवेह असे जाहीर करतात.   
   
 
45 “हेशबोनच्या सावलीत  
फरारी हतबलपणे उभे आहेत,  
हेशबोनमधून अग्नी येत आहे,  
सीहोनच्या मध्यातून ज्वाला पसरत आहेत;  
त्या मोआबाचे कपाळ जाळून टाकीत आहे,  
त्या कर्कश बढाईखोरांचे मस्तक जाळीत आहे.   
46 हे मोआबा, तुला धिक्कार असो!  
कमोश दैवताचे उपासक नष्ट झाले आहेत;  
आणि तुझ्या पुत्रांना बंदिवासात नेण्यात येत आहे  
व कन्यांना गुलाम करून नेण्यात येत आहे.   
   
 
47 “परंतु मी मोआबच्या समृद्धीची  
येत्या दिवसात पुन्हा भरपाई करेन,”  
असे याहवेह म्हणतात.  
मोआबाच्या न्यायाचे भाकीत येथे संपते.