2
इस्राएल परमेश्वराचा त्याग करतात 
 
1 तेव्हा याहवेहचे वचन मला प्राप्त झाले:  
2 “जा आणि यरुशलेमच्या लोकांस याची घोषणा कर:  
   
 
“याहवेह असे म्हणतात:  
“ ‘मला आठवण आहे, मला प्रसन्न करण्यासाठी  
तुम्ही एखाद्या नववधूप्रमाणे मजवर कशी प्रीती केली.  
आणि रानात  
व पेरणीरहित भूमीत देखील मला अनुसरला.   
3 इस्राएल हे याहवेहकरिता पवित्र होते;  
त्यांच्या हंगामाचे प्रथमफळ होते.  
ज्यांनी त्यांचा नाश केला,  
त्यांच्यावर दोष लावण्यात आला आणि घोर आपत्तीने त्यांना गाठले,’ ”  
असे याहवेह जाहीर करतात.   
   
 
4 याकोबाचे वंशजा, याहवेहचे वचन ऐका,  
सर्व इस्राएली कुळांनो तुम्ही सुद्धा.   
5 याहवेह असे म्हणतात:  
“तुमच्या पूर्वजांना माझ्याठायी असा कोणता अन्याय दिसला की  
ते माझ्यापासून इतके दूर गेले?  
आणि ते व्यर्थ मूर्तींना अनुसरू लागले,  
आणि स्वतःही तसेच निरुपयोगी बनले?   
6 त्यांनी असे विचारले नाही,  
‘ज्यांनी आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले  
आणि वैराण प्रदेशातून मार्गस्थ केले,  
वाळवंटातून व दऱ्याखोऱ्यातून नेले,  
निर्जल आणि गडद अंधकाराच्या भूमीतून नेले,  
ज्या प्रदेशातून कोणीही प्रवास करीत नाही  
व जिथे मनुष्यवस्ती नाही त्यातून आम्हाला नेले,  
ते याहवेह कुठे आहेत?’   
7 मी तुम्हाला एका सुपीक भूमीवर घेऊन आलो,  
तिची उपज आणि तिचे उत्तमोत्तम पदार्थ खाण्यासाठी आणले.  
परंतु तुम्ही ती भूमी अशुद्ध केली  
आणि माझे वतन अमंगळ केले.   
8 याजकांनी विचारले नाही,  
‘याहवेह कुठे आहेत?’  
नियमांचा अभ्यास करणाऱ्यांना माझी ओळख नव्हती;  
त्यांचे अधिपती तर माझ्याविरुद्ध बंड केले आहे.  
संदेष्टे बआल दैवताद्वारे संदेश देऊ लागले,  
आणि व्यर्थ मूर्तीचे अनुसरण करू लागले.   
   
 
9 “यास्तव मी तुमच्याविरुद्ध आरोप करणार आहे,”  
असे याहवेह जाहीर करतात.  
“आणि मी तुमच्या मुलांच्या मुलांवरही आरोप लावणार.   
10 समुद्राचा किनारा ओलांडून कित्तीम बेटाच्या तटावर जा आणि पाहा,  
केदारच्या वाळवंटात पाठवा व जवळून चौकशी करा;  
अशा प्रकारे कधी काही घडले का ते पहा:   
11 कोणत्याही राष्ट्रांनी आपले दैवत बदलले आहे काय?  
(जरी ते सर्व देव नाहीतच.)  
परंतु माझ्या लोकांनी आपल्या गौरवी परमेश्वराची  
व्यर्थ मूर्तींशी अदलाबदल केली.   
12 हे पाहून आकाश, विस्मयाने हादरून जा  
आणि भीतीने गर्भगळीत व्हा,”  
अशी याहवेह घोषणा करतात.   
13 “माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत:  
त्यांनी जीवनदायी पाण्याच्या झर्याला,  
म्हणजे मला, सोडले आहे,  
आणि ज्यात पाणी राहत नाही असे फुटके,  
गळके हौद स्वतःसाठी बांधले आहेत.   
14 जन्मापासूनच इस्राएल एक दास, गुलाम आहेत का?  
मग ते सगळ्यांची लूट का झाले आहेत?   
15 सिंहगर्जना करतात;  
त्यांनी त्यांच्यावर मोठ्याने गर्जना केली.  
त्यांनी त्यांची भूमी उद्ध्वस्त केली;  
त्यांची गावे जाळली व वैराण केली आहेत.   
16 मेम्फीस आणि तहपनहेसच्या सर्व लोकांनी  
तुमच्या कवट्यांना भेग पाडली आहे.   
17 ज्या याहवेहनी तुम्हाला योग्य मार्गाने चालविले  
त्या तुमच्या परमेश्वराचा त्याग करून,  
ही परिस्थिती तुम्ही स्वतःवर ओढवून घेतली नाही का?   
18 आता इजिप्तकडे कशाला जाता  
नील नदीचे पाणी पिण्यासाठी काय?  
आणि अश्शूराकडे का जावे  
फरात नदीचे पाणी पिण्यासाठी काय?   
19 तुमचा दुष्टपणाच तुम्हाला शिक्षा देईल;  
तुमचे माघार घेणे तुम्हाला दोषी ठरवेल.  
म्हणून विचार करा आणि तुमच्या लक्षात येईल  
याहवेह तुमच्या परमेश्वराचा त्याग करून दूर जाणे  
तुमच्यासाठी किती वाईट आणि कटू आहे,  
आणि माझे भय तुमच्यामध्ये नाही,”  
सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात.   
   
 
20 “फार फार पूर्वी तुम्ही माझे जू झुगारून दिले  
व मी बांधलेले दावे तोडून टाकले;  
तुम्ही म्हटले, ‘आम्ही तुमची सेवा करणार नाही!’  
अर्थात्, प्रत्येक उंच टेकडीवर,  
आणि प्रत्येक विस्तृत वृक्षाखाली  
तुम्ही वेश्येप्रमाणे निजलात.   
21 मी तुम्हाला एका उत्तम द्राक्षवेलीप्रमाणे लावले होते  
उत्कृष्ट व विश्वसनीय असे खोड दिले होते.  
मग तुम्ही माझ्याविरुद्ध का झालात  
भ्रष्ट व रानटी लता का झालात?   
22 तुम्ही स्वतःला साबणाने धुतले  
आणि विपुल प्रमाणात धुण्याची पावडर वापरली,  
तरी तुमचे कलंक माझ्यापुढे तसेच आहेत,”  
असे सार्वभौम याहवेह म्हणतात.   
23 “तुम्हाला कसे म्हणता येईल ‘मी अशुद्ध नाही;  
मी बआल दैवताच्या मागे गेलो नाही’?  
दरीत जाऊन तुम्ही कसे वागले ते पाहा,  
तुमच्या आचरणाबद्धल विचार करा.  
इकडे तिकडे पळणार्या  
चपळ उंटिणीसारखे तुम्ही आहात.   
24 वाळवंटात भटकण्याची सवय असलेल्या रानगाढवी प्रमाणे आहात,  
तुमच्या अनावर वासनांमुळे प्रत्येक वाऱ्याचा शोध घेणारे आहात;  
तुमच्या वासनांना कोणी आवर घालावा?  
कोणत्याही नराने तुमचा माग घेत असता स्वतःस थकवा आणू नये;  
संभोगासमयी त्यांना ती सापडेल.   
25 तुझे पाय पूर्णपणे खळ्यात उघडे पडेपर्यंत पळू नको,  
आणि तुझ्या घशाला कोरड पडली आहे.  
परंतु तू म्हटले, ‘याचा काही उपयोग नाही!  
मी परकीय दैवतावर प्रेम करतो,  
आणि मी त्यांचेच अनुसरण करणार.’   
   
 
26 “चोराला पकडल्यावर जशी त्याला लाज वाटते,  
तसे इस्राएल शरमिंदा झाला आहे—  
ते, त्यांचे राजे व त्यांचे सरदार,  
त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे हे सर्वजण.   
27 लाकडाच्या खांबाला ते म्हणतात, ‘तू आमचा पिता आहेस,’  
आणि पाषाणाला म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास.’  
त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली आहे,  
पण त्यांचे मुख नव्हे;  
परंतु संकट समय येताच ते माझा धावा करून म्हणतात,  
‘या आणि आमचे रक्षण करा!’   
28 तुम्ही स्वतःसाठी निर्माण केलेली दैवते कुठे आहेत?  
जर ते तुमचे रक्षण करू शकतील, तर त्यांनी यावे  
तुमच्या संकटसमयी यावे!  
तुम्ही यहूदीया, तुमच्या दैवतांची संख्या इतकी आहे  
जेवढी नगरे तुमच्या प्रांतात आहेत.   
   
 
29 “तुम्ही माझ्याविरुद्ध आरोप का करता?  
तुम्हा सर्वांनी माझ्याविरुद्ध बंड केले आहे,”  
असे याहवेह म्हणतात.   
30 “मी तुमच्या लोकांना उगाच शिक्षा केली;  
त्यांनी सुधारणेचा स्वीकार केला नाही.  
तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांचा नाश केला  
जणू एखादा खवखवलेला सिंहच.   
31 “या पिढीच्या लोकांनो, याहवेहच्या वचनावर विचार करा:  
“मी इस्राएलशी एखाद्यावर निर्जन प्रदेशाप्रमाणे  
किंवा अंधाऱ्याप्रदेशाप्रमाणे वागलो काय?  
माझे लोक असे का म्हणतात, ‘आम्ही मन मानेल तसे भटकण्यास मोकळे आहोत;  
आता पुन्हा आम्ही तुमच्याशी संबंध ठेवणार नाही’?   
32 एखादी कुमारी आपले दागदागिने किंवा  
एखादी वधू आपली विवाहाभूषणे विसरेल का?  
तरी माझे लोक मला,  
असंख्य दिवसापासून विसरले आहेत.   
33 तुमच्या प्रियकराचे मन वळविण्यात तुम्ही किती तरबेज आहात!  
अत्यंत चरित्रहीन स्त्रियांनाही तुमच्यापासून धडे शिकता येतील.   
34 निष्पाप लोकांच्या रक्ताने  
तुमची वस्त्रे माखली आहेत,  
तुमच्या घरात चोरी करण्यासाठी शिरतांना त्यांना तुम्ही बघितले नाही.  
असे सर्व असूनही   
35 तुम्ही म्हणता, ‘मी निर्दोष आहे;  
परमेश्वर माझ्यावर रागावले नाहीत.’  
परंतु मी तुमचा न्याय करेन  
कारण तुम्ही म्हटले, ‘मी पाप केलेले नाही.’   
36 तुम्ही आपले मार्ग सोडून  
पथभ्रष्ट का होता?  
अश्शूरने तुमचा आशाभंग केला  
तसाच इजिप्तही करेल.   
37 तुम्हीही आपले स्थान सोडणार  
आपले हात डोक्यावर ठेऊन जाल,  
कारण ज्यांच्यावर तुमचा भरवसा आहे, त्यांनाच याहवेहने नाकारले आहे.  
ते तुम्हाला मदत करणारच नाहीत.