2
ऐक्याप्रीत्यर्थ विनंती
1 ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करूणा ही जर आहेत,
2 तर तुम्ही समचित्त व्हा, एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकमनाचे व्हा. अशाप्रकारे माझा आनंद पूर्ण करा.
नम्रतेप्रीत्यर्थ विनंती
3 आणि तुम्ही विरोधाने किंवा पोकळ अभिमानाने काही करू नका, पण मनाच्या लीनतेने आपल्यापेक्षा एकमेकांना मोठे मानावे.
4 तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेहि पाहा.
प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण
5 अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याठायीही असो.
6 तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही,
7 तर स्वतःला रिकामे केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले,
8 आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.
9 ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे.
10 ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा,
11 आणि हे देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जीभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
सत्शील तारणप्राप्तीचा पुरावा आहे
12 म्हणून माझ्या प्रियांनो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहा, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विषेशकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कांपत आपले तारण साधून घ्या.
13 कारण इच्छा करणे आणि कार्य करणे तुमच्या ठायी आपल्या सुयोजनेसाठी साधून देणारा तो देव आहे.
14 जे काही तुम्ही कराल कुरकुर आणि वादविवाद न करता करा;
15 ह्यासाठी की, या कुटिल आणि विपरीत पिढीमध्ये तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे; त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवतांना ज्योतीसारखे जगात दिसता.
16 जीवनाच्या वचनास दृढ धरुन राहा, असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल.
17 तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा, होतांना जरी मी अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो;
18 आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा.
तीमथ्य
19 प्रभू येशूमध्ये मी आशा करतो की, लवकरच मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवेन म्हणजे, तुम्हा विषयीच्या गोष्टी जाणून माझे समाधान होईल.
20 कारण तुमच्या विषयीच्या गोष्टीची खरी काळजी करील असा, दुसरा कोणी समान वृतीचा माझ्याजवळ नाही;
21 कारण, सगळे स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाहीत.
22 पण तुम्ही त्याचे शील हे जाणता की, जसा मुलगा पित्याबरोबर सेवा करतो, तशी त्याने शुभवर्तमानासाठी माझ्याबरोबर सेवा केली.
23 म्हणून माझे काय होईल ते दिसून येताच, त्यास रवाना करता येईल अशी मी आशा करतो.
24 पण मीही स्वतः लवकरच येईन असा प्रभूमध्ये मला विश्वास आहे.
एपफ्रदीत
25 तरी मला माझा बंधू आणि सहकारी व सहसैनिक आणि तुमचा प्रेषित आणि माझी गरज भागवून माझी सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठविण्याचे आवश्यक वाटले.
26 कारण तो आजारी आहे हे तुम्ही ऐकले होते असे त्यास समजल्यावर त्यास तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत अस्वस्थ झाला होता;
27 तो खरोखर, मरणाजवळ आला होता पण देवाने त्याच्यावर दया केली आणि केवळ त्याच्यावर नाही तर, मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून माझ्यावरही केली.
28 म्हणून, मी त्यास पाठविण्याची अधिक घाई केली, म्हणजे त्यास पुन्हा भेटून तुम्ही आनंद करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले.
29 ह्यावरून पूर्ण आनंदाने तुम्ही त्याचे प्रभूमध्ये स्वागत करा. अशांचा मान राखा.
30 कारण माझी सेवा करण्यांत तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.