29
यिर्मयाचे बंदिवान लोकांस पत्र
1 बंदिवान करून नेलेल्यांतील राहिलेले वडील याजक, संदेष्टे आणि यरूशलेमेमधून बाबेलास ज्यास नबुखद्नेस्सराने कैद करून नेले होते, त्या सर्व लोकांस यिर्मया संदेष्ट्याने यरूशलेमेहून पत्र पाठवले.
2 राजा यकन्या, राजमाता, व उच्च अधिकारी, यहूदाचे व यरूशलेमेचे नेते, व कारागीर हे यरूशलेमेमधून निघून गेल्यावर यिर्मयाने हे पत्र पाठवले.
3 ज्यांना यहूदाचा राजा सिद्कीया याने बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याच्याकडे एलास शाफानाचा व गमऱ्या हिल्कीयाचा मुलगा यांच्या हस्ते पत्र पाठवले.
4 पत्रात असे म्हटले, ज्यांना मी यरूशलेमेहून कैद करून बाबेलास नेण्यास लावले त्या सर्वांना सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे सांगतो,
5 “घरे बांधून त्यामध्ये राहा. बागे लावा आणि त्याचे फळ खा.
6 स्त्रिया करा, आणि मुलाला व मुलीला जन्म द्या, नंतर आपल्या मुलांसाठी स्त्रिया करून द्या आणि तुमच्या मुलींना नवरे करून द्या. त्यांनी मुलांना व मुलींना जन्म द्यावा. तेथे तुम्ही वाढा, कमी होऊ नका.
7 मी ज्या नगरांत तुम्हास बंदिवान करून न्यायला लावले त्याच्या शांतीसाठी झटा आणि त्यांच्यावतीने माझ्याबरोबर मध्यस्थी करा. कारण त्यांच्या शांतीत तुमची शांती आहे.”
8 कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “तुमच्यामध्ये असलेले तुमचे संदेष्टे आणि ज्योतिषीह्न्जी यांनी तुम्हास फसवू नये आणि तुम्ही ज्यास आपली स्वप्ने पाहण्यास लावता त्याचे तुम्ही ऐकू नका.
9 कारण ते माझ्या नामाने लबाड भविष्य सांगतात. मी त्यांना बाहेर पाठविले नाही.” असे परमेश्वर म्हणतो.
10 कारण परमेश्वर असे म्हणतो, जेव्हा बाबेलाच्या राज्यास सत्तर वर्षे होतील, मी तुम्हास मदत करील आणि तुम्हास या स्थळी परत आणण्याचे सुवचन मी पूर्ण करीन.
11 कारण परमेश्वर असे म्हणतो की, तुमच्याविषयी माझ्या मनात ज्या योजना आहेत त्या मी जाणतो; त्या योजना तुमच्या हिताच्या आहेत आणि अनिष्टासाठी नाहीत, त्या तुम्हास भविष्य व आशा देणाऱ्या आहेत.
12 मग तुम्ही माझा धावा कराल आणि जाऊन माझी प्रार्थना कराल आणि तेव्हा मी तुमचे ऐकेन.
13 कारण जेव्हा तुम्ही आपल्या संपूर्ण हृदयाने मला शोधाल, तेव्हा मी तुम्हास सापडेन.
14 परमेश्वर असे म्हणतो की मग मी तुम्हास प्राप्त होईल. “मी तुम्हास बंदिवासातून परत आणीन आणि ज्या सर्व राष्ट्रांत व सर्व स्थानात मी तुम्हास विखरविले त्यातून मी तुम्हास एकवटीन आणि ज्या स्थानातून मी तुम्हास कैद करून नेले आहे त्याकडे मी तुम्हास परत आणीन.” असे परमेश्वर म्हणतो.
15 “कारण तुम्ही म्हटले आहे की, परमेश्वराने आम्हासाठी बाबेलामध्ये संदेष्टे उत्पन्न केले आहेत.”
16 दावीदाच्या सिंहासनावर जो बसला आहे त्याच्याविषयी आणि जे लोक त्या नगरात राहतात, तुमचे बांधव जे बंदिवासात तुमच्याबरोबर बाहेर गेले नाहीत, त्या सर्वांविषयी परमेश्वर म्हणतो,
17 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, पाहा, मी त्यांच्यावर तलवार, दुष्काळ आणि आजार पाठवीन. कारण मी त्यांना कुजलेल्या अंजिरासारखे करीन जे खाण्याससुद्धा घाणेरडे असते.
18 आणि मी त्यांचा तलवार, दुष्काळ आणि मरीने पाठपुरावा करीन आणि पृथ्वीवरील सर्व राज्याच्या दृष्टीने दहशत पोहचेल असे मी त्यांना करीन. मी त्यांना ज्या राष्ट्रात विखरविले आहे तेथे भयंकर भीती, शाप व निंदा व उपहास या गोष्टींचे ते विषय होतील.
19 परमेश्वर असे म्हणतो, याचे कारण हे आहे की, मी आपले सेवक संदेष्टे यांच्याद्वारे माझी वचने पाठवली, तरी त्यांनी माझे ऐकले नाही. मी वारंवार त्यांना पाठवले पण तुम्ही ऐकले नाही, असे परमेश्वर म्हणतो.
20 “तर बंदिवानानो ज्या तुम्हास यरूशलेमेहून बाबेलास पाठविले ते तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका.”
21 कोलायाचा मुलगा अहाब व मासेयाचा मुलगा सिद्कीया, ते माझ्या नावाने खोटे भविष्य सांगतात, यांच्याविषयी इस्राएलाचा देव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी त्यांना बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराच्या हाती देईन. आणि तो त्यास तुमच्या डोळ्यांसमोर ठार करील.
22 नंतर यहूदाचे जे सर्व बंदिवान करून बाबेलात नेलेल्या या मनुष्यांविषयी हा शाप म्हणतील, सिद्कीया व अहाब यांना बाबेलाच्या राजाने अग्नीवर भाजले तसे परमेश्वर तुला करो.
23 हे यासाठी होईल की, कारण त्यांनी इस्राएलामध्ये लज्जास्पद गोष्टी केल्यात, आपल्या शेजाऱ्यांच्या बायकांबरोबर व्यभिचार केला आणि जे मी त्यांना आज्ञापिले नाही ते वचन ते खोटेपणाने माझ्या नावाने बोलले आहेत. कारण जो मी एक आहे तो जाणतो. असे परमेश्वर म्हणतो.
24 शमाया नेहेलमकराबद्दल, हे सांग,
25 सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे म्हणतो, कारण जे सर्व लोक यरूशलेमेत आहेत त्यांच्याकडे व मासेयाचा मुलगा याजक सफन्या व सर्व याजक यांच्याकडे तू आपल्या नावाने पत्रे पाठवून व म्हटले,
26 परमेश्वराने तुला यहोयादाच्या जागी याजक म्हणून नेमले आहे. यासाठी की, परमेश्वराच्या मंदिराचा तू अधिकारी असावे. जो कोणी वेडा होऊन आपणास संदेष्टा करतो, ते सर्व लोक तुझ्या नियंत्रणात आहेत. तू त्यांना खोड्यात अडकवून व बेडी घालावी.
27 म्हणून आता, अनाथोथकर यिर्मया जो आपणास तुम्हासमोर संदेष्टा म्हणवतो त्यास तू का धमकावले नाहीस?
28 कारण त्याने बाबेलास आम्हाकडे पत्र पाठवले व म्हटले की, “बंदिवास दीर्घकाळ राहील, म्हणून घरे बांधा, वस्ती करा, बागा लावा व त्याची फळे खा.”
29 सफन्या याजकाने हे पत्र यिर्मया संदेष्ट्याला ऐकू येईल असे वाचले.
30 मग यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,
31 “सर्व बंदिवासांतल्या लोकांस निरोप पाठव व सांग, नेहेलमकर घराण्यातील शमाया याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो ‘कारण शमायाने तुम्हास भविष्य सांगितले आहे पण मी त्यास पाठविलेले नाही. कारण तुम्ही खोट्यावर विश्वास ठेवावा, असे त्याने केले आहे.
32 म्हणून परमेश्वर असे म्हणतो की, पाहा, मी शमाया नेहेलमकराला आणि त्याच्या वंशजाला शिक्षा करीन. या लोकांमध्ये वस्ती करायला त्याचा कोणी उरणार नाही. मी आपल्या लोकांसाठी जे चांगले करीन ते तो पाहणार नाही. कारण त्याने परमेश्वराविरूद्ध गैरविश्वासाचे भाषण केले आहे. असे परमेश्वर म्हणतो.