26
निवासमंडप
निर्ग. 36:8-38
1 निवासमंडप दहा पडद्यांचा कर. ते कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतापासून तयार करावेत. व त्यावर कुशल कारागिराकडून करुब काढावेत.
2 प्रत्येक पडद्याचे मोजमाप एक सारखेच असावे म्हणजे लांबी अठ्ठावीस हात व रूंदी चार हात असावी;
3 त्यांपैकी पाच पडदे एकत्र जोडून एक भाग करावा व दुसऱ्या पाचांचा जोडून दुसरा भाग करावा;
4 जेथे एक पडदा दुसऱ्याशी जोडला जाईल तेथे किनारीवर निळ्या सुताची बिरडी करावीत, तसेच दुसऱ्या पडद्यावरील किनारीवरही तशीच बिरडी कर
5 एका पडद्याला पन्नास बिरडी कर व दुसऱ्या पडद्याच्या किनारीला पन्नास बिरडी कर. ही बिरडी समोरासमोर असावी;
6 पडद्यांचे ते दोन भाग जोडण्यासाठी सोन्याच्या पन्नास गोल कड्या बनवून त्यांच्या साहाय्याने ते दोन भाग एकत्र असे जोडावेत की सर्व मिळून निवासमंडप तयार होईल.
7 त्यानंतर निवासमंडपावरच्या तंबूसाठी बकऱ्याच्या केसांचे पडदे करावेत. हे पडदे अकरा असावे.
8 हे सर्व पडदे एकसारख्या मोज मापाचे म्हणजे तीस हात लांब व चार हात रुंद अशा मापाचे बनवावेत.
9 त्यातून पाच पडदे एकत्र जोडावे आणि सहा पडदे एकत्र जोडावे. सहावा पडदा तंबूच्या पुढल्या बाजूला दुमडावा.
10 पहिल्या भागाच्या कडेखाली पन्नास बिरडी करावीत व दुसऱ्या भागाच्या कडेलाही तशीच पन्नास बिरडी करावीत;
11 नंतर पडदे जोडण्यासाठी पितळेच्या पन्नास गोल कड्या कराव्यात; त्यामुळे दोन भागांना जोडून तंबू अखंड होईल.
12 या तंबूच्या शेवटच्या पडद्याचा अर्धा भाग पवित्र निवासमंडपाच्या मागच्या टोकाखाली लोंबत राहील.
13 आणि तंबूचे पडदे लांबीकडून हातभर या बाजूला व हातभर त्या बाजूला निवासमंडप झाकण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूला लोंबते ठेवावे.
14 तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे एक आच्छादन व दुसरे समुद्र प्राण्याच्या कातड्याचे एक आच्छादन करावे.
15 पवित्र निवासमंडपाला बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्यांचा आधार करावा.
16 प्रत्येक फळीची लांबी दहा हात व उंची दीड हात असावी.
17 प्रत्येक फळी दुसऱ्याशी जोडण्यासाठी दोन बाजूला दोन कुसे करावीत; निवासमंडपाच्या सर्व फळ्या अशाच कराव्यात.
18 पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूसाठी वीस फळ्या कराव्यात.
19 फळ्यांसाठी चांदीच्या चाळीस बैठका कराव्यात. प्रत्येक फळीला आत खोल जाण्यासाठी प्रत्येक बाजूस एक बैठक या प्रमाणे चांदीच्या दोन बैठका असाव्यात.
20 पवित्र निवासमंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूसाठी वीस फळ्या कराव्यात;
21 आणि त्यांच्यासाठी प्रत्येक फळीखाली दोन बैठका या प्रमाणे चांदीच्या चाळीस बैठका कराव्यात.
22 पवित्र निवासमंडपाच्या मागच्या बाजूसाठी म्हणजे पश्चिम बाजूसाठी आणखी सहा फळ्या कराव्यात;
23 आणि मागील बाजूला कोपऱ्यांसाठी दोन फळ्या कराव्यात.
24 कोपऱ्याच्या फळ्या खालच्या बाजूला जोडाव्यात; त्यांच्यावरील भागांची कडी त्यांना जोडून ठेवील, दोन्ही कोपऱ्यांसाठी असेच करावे.
25 पवित्र निवासमंडपाच्या पश्चिम टोकास एकूण आठ फळ्या असतील आणि त्या प्रत्येक फळीच्या खाली दोन याप्रमाणे चांदीच्या सोळा बैठका असतील.
26 त्यांच्या फळ्यांसाठी बाभळीच्या लाकडाचे अडसर करावेत; त्यांच्या पहिल्या बाजूस पाच अडसर व
27 दुसऱ्या बाजूस पाच अडसर असावेत; आणि त्यांच्या पाठीमागच्या म्हणजे पश्चिम बाजूस पाच अडसर असावेत.
28 मध्य भागावरील अडसर लाकडांच्या फळ्यातून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जावा.
29 फळ्या आणि अडसर सोन्याने मढवावेत आणि त्यांना जोडणाऱ्या कड्याही सोन्याच्या कराव्यात.
30 मी तुला पर्वतावर दाखवल्याप्रमाणे पवित्र निवासमंडप बांधावा.
31 तलम सणाच्या कापडाचा व निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा एक अंतरपट बनवावा आणि त्यावर कुशल कारागिराकडून करुब काढून घ्यावेत.
32 बाभळीच्या लाकडाचे चार खांब बनवून ते सोन्याने मढवावेत, त्यावर सोन्याच्या आकड्या लावाव्यात आणि ते खांब चांदीच्या चार उथळ्यांत उभे करावेत;
33 सोन्याच्या आकड्याखाली हा पडदा ठेवावा मग त्याच्यामागे आज्ञापटाचा कोश-ठेवावा; हा अंतरपट पवित्र स्थान व परमपवित्र स्थान यांना अलग करील;
34 परमपवित्रस्थानातील आज्ञापटाच्या कोशावर दयासन ठेवावे.
35 अंतरपटाच्या दुसऱ्या बाजूला तू बनविलेला मेज ठेवावा; तो निवासमंडपाच्या उत्तर बाजूला असावा व दक्षिण बाजूला मेजासमोर दीपवृक्ष ठेवावा.
36 “पवित्र निवासमंडपाच्या दारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा पडदा करून त्यावर वेलबुट्टीदार पडदा बनवावा.
37 हा पडदा लावण्यासाठी बाभळीच्या लाकडाचे पाच खांब करावेत व ते सोन्याने मढवावेत; त्यांच्याकरिता पितळेच्या पाच बैठका बनवाव्यात; हा पडदा अडकविण्यासाठी सोन्याच्या आकड्या कराव्यात.”