18
करिंथ येथे पौल
1 नंतर पौलाने अथेनै शहर सोडले व करिंथ शहरास गेला.
2 करिंथमध्ये पौल एका यहूदी मनुष्यास भेटला ज्याचे नाव अक्विला असे होते, तो पंत प्रांतातील रहिवासी होता, आपली पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता, कारण सर्व यहूदी लोकांनी रोम शहर सोडून गेले पाहिजे असा हुकूम क्लौद्याने काढला होता, पौल त्यांना भेटावयास गेला.
3 पौलासारखेच ते तंबू बनवणारे होते, तो त्यांच्याबरोबर राहिला व त्यांच्याबरोबर काम करू लागला.
4 प्रत्येक शब्बाथवारी पौल सभास्थानात यहूदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे, आणि तो यहूदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे.
5 जेव्हा सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून परत आले, तेव्हा पौल यहूदी लोकांस उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला, येशू हाच ख्रिस्त आहे. अशी साक्ष देऊ लागला.
6 परंतु यहूदी लोकांनी पौलाला विरोध केला, त्यास यहूदी लोक वाईट रीतीने बोलले, तेव्हा आपला निषेध दर्शविण्याकरिता पौलाने आपल्या अंगावरील कपडे झटकले, तो यहूदी लोकांस म्हणाला, “जर तुमचे तारण झाले नाही, तर तो तुमचा दोष असेल! तुमचे रक्त तुमच्याच माथी असो! मी निर्दोष आहे, येथून पुढे मी परराष्ट्रीय लोकांकडेच जाईन.”
7 पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तीत युस्त नावाचा देवाचा उपासक याच्या घरी गेला.
8 त्या सभास्थानाचा क्रिस्प हा पुढारी होता, क्रिस्पने व त्याच्या घरातील सर्वांनी प्रभूवर विश्वास ठेवला, करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला, करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला.
9 एके रात्री, प्रभूने स्वप्नामध्ये पौलाला म्हटले, “घाबरु नको, बोलत राहा, शांत राहू नको.
10 मी तुझ्याबरोबर आहे, कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही; कारण या शहरात माझे पुष्कळ लोक आहेत.”
11 म्हणून पौल तेथे दीड वर्षे देवाचे वचन त्या लोकांस शिकवीत राहिला.
गल्लियो आणि पौल
12 जेव्हा गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल होता, त्यावेळेस काही यहूदी पौलविरुद्ध एकत्र आले आणि त्यास न्यायासनापुढे उभे केले.
13 यहूदी लोक म्हणाले, “हा मनुष्य अशा रीतीने लोकांस देवाची उपासना करायला शिकवीत आहे की, जे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”
14 पौल काही बोलणार इतक्यात गल्लियो यहूदी लोकांस म्हणाला, “एखादा अपराध किंवा वाईट गोष्ट असती तर तुमचे म्हणणे ऐकून घेणे रास्त ठरले असते.
15 परंतु ज्याअर्थी ही बाब शब्द, नावे व तुमच्या नियमशास्त्रातील प्रश्नांशी संबंधित आहे, त्याअर्थी तुम्हीच तुमची समस्या सोडवा, अशा गोष्टींबाबत न्याय करण्यास मी नकार देतो.”
16 मग गल्लियोने त्यांना न्यायासनापुढून घालवून दिले.
17 मग त्या सर्वांनी सभास्थानाचा प्रमुख सोस्थनेस याला न्यायासनासमोर मारहाण केली, पण गल्लियोने त्याकडे लक्ष दिले नाही.
पौल सुरियास परत येतो
18 पौल बंधुजनांबरोबर बरेच दिवस राहिला, नंतर तो निघाला व सिरीया प्रांताला समुद्रमार्गे गेला आणि त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विला ही दोघे होती, पौलाने किंख्रिया शहरात आपल्या डोक्याचे मुंडण केले, कारण त्याने नवस केला होता.
19 मग ते इफिस येथे आले, पौलाने प्रिस्किल्ला व अक्विला यांना तेथे सोडले, तो सभास्थानात गेला आणि यहूदी लोकांबरोबर वादविवाद केला.
20 जेव्हा त्यांनी त्यास तेथे आणखी काही वेळ थांबण्यासाठी सांगितले, तेव्हा तो कबूल झाला नाही.
21 परंतु जाता जाता तो म्हणाला, “देवाची इच्छा असेल तर मी परत तुमच्याकडे येईन” मग तो समुद्रमार्गे इफिसहून निघाला.
22 जेव्हा पौल कैसरीया येथे आला, तेव्हा तो तेथून वर यरूशलेम शहरास गेला आणि मंडळीला भेटला, मग तो खाली अंत्युखियाला गेला.
23 तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला आणि गलतिया व फ्रुगिया या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला, त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले.
इफिसमध्ये अपुल्लो
24 अपुल्लो नावाचा एक यहूदी होता, तो आलेक्सांद्र शहरात जन्मला होता, तो उच्च शिक्षित होता, तो इफिस येथे आला, त्यास शास्त्रलेखाचे सखोल ज्ञान होते.
25 परमेश्वराच्या मार्गाचे शिक्षण त्यास देण्यात आले होते, तो आत्म्यात आवेशी असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवीत असे व बोलत असे, तरी त्यास फक्त योहानाचा बाप्तिस्माच ठाऊक होता.
26 तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रस्किला व अक्विला ह्यांनी त्यांचे भाषण ऐकूण त्यास जवळ बोलावून घेतले व त्यास देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला.
27 अपुल्लोला अखया देशाला जायचे होते, तेव्हा बंधुंनी त्यास उत्तेजन दिले आणि तेथील येशूच्या शिष्यांना त्याचे स्वागत करण्याविषयी लिहिले, जेव्हा तो पोहोंचला, तेव्हा ज्यांनी कृपेमुळे विश्वास ठेवला होता, त्यांना त्याने खूप मदत केली.
28 जाहीर वादविवादात त्याने यहूदी लोकांस फार जोरदारपणे पराभूत केले आणि पवित्र शास्त्रलेखाच्या आधारे येशू हाच ख्रिस्त आहे हे सिद्ध केले.